
रुग्णांना रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करू नका; FDA आयुक्तांचे स्पष्ट निर्देश
प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातीलच औषध दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती केल्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्राने महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, रुग्णांना रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडणे हे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ९ डिसेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे सर्व विभागीय सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि औषध निरीक्षकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते. मात्र, अशी सक्ती करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि त्याअंतर्गत नियमांच्या विरोधात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
FDA ने स्पष्ट केले आहे की:
रुग्णांना कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा अधिकार आहे.
रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.
रुग्णालयांनी याबाबत जनजागृती करणारे फलक ठळकपणे लावणे बंधनकारक आहे.
फलकावर “रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करू शकतात” असा मजकूर असावा.
संबंधित सूचना सर्व परवानाधारक औषध विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
या निर्णयामुळे रुग्णांना औषधांच्या किंमतींची तुलना करून स्वस्त दरात औषधे खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. तसेच रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांची मक्तेदारी रोखण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून औषधे विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्यास संबंधित रुग्ण किंवा नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करू शकतात. अशा तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाऊ शकते
रुग्णांना औषधे कुठून खरेदी करायची याचा पूर्ण अधिकार आहे. कोणतेही रुग्णालय किंवा औषध दुकान रुग्णांवर बंधने घालू शकत नाही, असे FDA ने स्पष्ट केले आहे.
#FDA #FoodAndDrugAdministration #MaharashtraFDA #AbhimanyuKale #HospitalPharmacy #PatientRights #MedicalNews #MaharashtraNews #HealthNews #MedicinePurchase #Healthcare #VeerMaharashtraNews #BreakingNews #MumbaiNews #fdaorder #TukaramMundhe #TukaramMundhe