भुसावळ नगरपरिषदेच्या कारभाराचे आणि दप्तराचे स्थलांतर करण्याच्या निर्णयावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक संतोष चौधरी यांनी सध्याच्या नगरपरिषद इमारतीची अवस्था 'कोंडवाड्या'सारखी असल्याचे म्हटले होते. यावर शनिवारी १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. "जर ही इमारत कोंडवाडा असेल, तर तुम्ही तिथे गरिबांवर उपचार करणार का?" असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.