‘वर्ल्ड टॉयलेट समिट 2025’ या जागतिक स्तरावरील परिषदेत नवी मुंबई महानगरपालिकेस ‘मॅनहोल टू मशीनहोल’ या यशस्वी अंमलबजावणी झालेल्या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवी मुंबई महानगरपालिकेस आपले उल्लेखनीय उपक्रम मांडण्याची संधी मिळणे हा महानगरपालिकेचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मान्यतेने व अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नमुंमपा उपअभियंता स्वप्नील देसाई यांनी ‘मॅनहोल टू मशीनहोल –ऑपरेशन्समधील कार्यक्षमता’ या विषयावर नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करुन प्रभावी सादरीकरण केले. या माहितीपूर्ण सादरीकरणाची विविध देशातील उपस्थित प्रतिनिधींनी प्रशंसा केली.