सध्या पाऊस ओसरत असताना वातावरणातील उष्णता कमालीची वाढली असून पावसाळी कालावधीतील रस्त्यांकडेचा चिखल वाळल्याने धुळीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गोष्टाकडे गांभीर्याने लक्ष देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्राधान्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर सखोल स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते व नागरिकांची वर्दळ असते असे शहरातील ठाणे बेलापूर मार्ग, आम्र मार्ग, पामबीच मार्ग तसेच अंतर्गत मुख्य रस्ते या रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला साचलेली माती आज रविवारी दुपारी २ च्या सुमारास साफ करून उचलून घेण्याची सखोल स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. या साफसफाईत ब्रशने रस्त्याचा पृष्ठभाग साफ केला जात आहे.