जुई गावात गेल्या दहा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना, भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि जुई गाव ग्रामस्थ कमिटीने तातडीने पुढाकार घेत संबंधित यंत्रणांना एकत्र आणत प्रभावी उपाययोजना केल्या. या समस्येच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांसह जुई गाव ग्रामस्थ कमिटीने सिडकोचे अधिकारी, पनवेल महानगरपालिका तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत जुई गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबाबत स्पष्ट व ठाम सूचना देण्यात आल्या.