महाड तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील दोन अल्पवयीन बालिकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त पथकाच्या समन्वयाने होणारे 2 बालविवाह थांबवले. कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांना बालविवाह बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलींच्या वयाची खात्री केली असता त्या दोन्ही मुलींचे वय अनुक्रमे 16 वर्षे 8 महिने व 16 वर्षे 1 महिना असल्याचे आढळून आले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे विवाहाचे वय किमान 18 वर्षे मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर विवाह बालविवाह असून तो कायद्याने बेकायदेशीर ठरत होता त्यामुळे वरील माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवला.