शिवसेना कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सोमवारी खोपोली शहरात संतापाची लाट पाहायला मिळाली. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य कॅण्डल मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होऊन त्यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला. सायंकाळच्या सुमारास साईबाबानगर येथील काळोखे यांच्या निवासस्थानापासून या कॅण्डल मार्चला सुरुवात झाली. हातात मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेऊन हजारो खोपोलीकर या आंदोलनात सामील झाले होते.