आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेकडून जोरदार तयारी सुरू असून आज पोलीस प्रशासन तसेच शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी यावेळी बैठकीत चर्चा झाली. रोख रक्कम, दारू तसेच अमली पदार्थ याच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी चेकपोस्ट ची उभारणी, भरारी पथके, व्हिडीओ पथकांचा प्रभावी वापर इत्यादी बाबींवर चर्चा झाली. यावेळी मुंबई झोन 3 चे उपायुक्त दिपक मोहिते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली.