आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार स्वीप कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पथनाट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जात असून गेल्या दोन दिवसांपासून कळंबोली व खारघर प्रभागात विविध १६ ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली.