रायगड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मद्यविक्रीने उच्चांक गाठला असून, तब्बल 43 लाख 27 हजार 525 बल्क लिटर दारू तळीरामांनी रिचवली. यामध्ये बीअरची विक्री सर्वाधिक झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. देशी व विदेशी दारूपेक्षा बीअरला मद्यपींची पसंती मिळाल्याने वाईनच्या विक्रीत मात्र लक्षणीय घट नोंदवली गेली. डिसेंबरमध्ये नाताळसह थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॉटेज पर्यटकांनी फुल्ल होते. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी या कालावधीत जिल्ह्याला भेट दिल्याने मद्यविक्रीत प्रचंड वाढ झाली.