नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक कर संकलन करून लक्षणीय कामगिरी केली आहे. कर संकलनातील ही झेप लोकाभिमुख उपक्रम, डिजिटल पेमेंट्सला दिलेले प्रोत्साहन तसेच करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती मोहिमांमुळे तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे सांगितले आहे. नवी मुंबई महानगरपालिका पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारासाठी कटिबद्ध असून, या उत्पन्नाचा उपयोग शहराच्या विकास कामांसाठी केला जाणार आहे असे सांगतानाच आयुक्तांनी करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत.