देवळी–पुलगाव मतदारसंघातील खर्डा–वाबगाव, मोझरी पोटी आणि करंजी–पुजाई–भानखेडा या ठिकाणी पुलांच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार राजेश बकाने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ६ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या पुलांमुळे पावसाळ्यातील वाहतुकीचा त्रास कमी होणार असून शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास, रुग्णांची ने-आण आणि ग्रामस्थांचे दैनंदिन दळणवळण अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.