मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमासाठी देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ नवी दिल्ली येथे १०४ व्या स्कॉच शिखर परिषदेत आज महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांनी स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या हस्ते स्विकारला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा हा देशपातळीवर दखल घेत झालेला गौरव आहे.