दिग्रस: तालुक्यातील अष्टा येथील तंटामुक्त अध्यक्षांच्या घरावर कोसळली वीज; घराचे छत तुटून मोठे नुकसान
दिग्रस तालुक्यातील अष्टा येथे दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू असताना तंटामुक्त अध्यक्ष श्रीराम सूर्यभान चव्हाण यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत घराच्या स्लॅबचे नुकसान झाले असून, छताचा काही भाग तुटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाच्या जोरदार सरी, आकाशात कडकडणाऱ्या विजांचा आवाज आणि अचानक कोसळलेल्या विजेमुळे परिसरात क्षणभर भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.