बॉम्बे रेस्टॉरंटजवळील सेवा रस्त्यावर अनेक कंपन्यांनी केलेले बेकायदेशीर पार्किंग तसेच फुटपाथवरील अतिक्रमण अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचा गंभीर आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या अतिक्रमणामुळेच संबंधित ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सेवा रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने तसेच पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथ पूर्णपणे व्यापला गेल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळेच अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.