प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, सातारा येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सततच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील वाहनमालक व चालकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यालयातील अनेक कर्मचारी आपल्या नेमून दिलेल्या कामाऐवजी बाहेरील कामांमध्ये व्यस्त राहत असल्याने ज्या विभागांमध्ये वाहनसंबंधित कामकाज चालते, त्या विभागांमध्ये कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर बसणाऱ्या प्रतिनिधींनी आज सोमवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज मोठ्या प्रमाणावर मंदावले.