शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची अद्दल घडविली आहे. सुधाकर बाळकृष्ण निंबार्ते (४३, रा. खोकरला) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही खळबळजनक घटना २८ जुलै २०१७ रोजी लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा येथे घडली होती, जिथे किरकोळ वादाचे रूपांतर हिंसेत होऊन सुधाकरने राजेंद्र निंबार्ते यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता.