नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता 15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाली असून आचारसंहितेचे पालन होत असल्याबाबत निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या संनियंत्रणाखाली आचारसंहिता कक्ष व त्या अंतर्गत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये सुरु झाली असून त्या प्रत्येक कार्यालयासाठी पहिल्या टप्प्यात तीन आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक व व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक कार्यरत होत आहेत. यासोबतच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्हिडीओ पाहणी पथकेही कार्यरत असणार आहेत.