रोहा: सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस पलटी
Roha, Raigad | Nov 30, 2025 सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीची खासगी मिनीबस नांदगाव बुद्रुक येथे पलटी झाली. या अपघातात सहाजण जखमी झाले असून यामध्ये चार विद्यार्थिनी, शिक्षक व चालकाचा समावेश आहे. अन्य जखमींची प्रकृती स्थिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, बाऊच, (ता. वाळवा) या शाळेतील हे विद्यार्थी असून शनिवारी रात्री 11 वाजता ते खासगी मिनीबसने सहलीसाठी निघाले होते. पहाटे 5.50 च्या सुमारास महाडकडून किल्ले रायगडकडे जाताना नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्याने हा अपघात घडला. घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.