माण तालुक्यातील लोधवडे पवार वस्ती जवळ बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघाताने पळशी गावावर शोककळा पसरली आहे. भाच्याचा वाढदिवस साजरा करून परतीच्या वाटेवर असताना दोन चुलत भावांचा बेफाम वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने घेतलेला बळी संपूर्ण समाजाला हेलावून गेला. घटनेनंतर रात्री दोन वाजता शवविच्छेदन करण्यात आले तर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांमध्ये सुनील छगन देवकुळे आणि अभिनंदन विलास देवकुळे (दोघेही रा. पळशी, ता. माण) यांचा समावेश आहे.