खुलताबाद: पिंपरी शिवारात बिबट्याचा हल्ला; गायीच्या वासराचा फडशा, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
खुलताबाद तालुक्यातील पिंपरी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ माजला असून बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फुलकोर दिलीपसिंग महेर यांच्या गट क्र.80 शिवारात घडलेल्या या घटनेची माहिती पत्रकार किरण महेर यांनी वन विभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.