तुळजापूर: तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ; भाविक भक्तांची मोठी गर्दी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा रविवारी, १५ सप्टेंबर रोजी भाद्रपद वद्य अष्टमीस पार पडली. सकाळपासून शेकडो सुवासिनींनी गादीचा कापूस वेचून स्वच्छ केला, पिंजारी समाजाच्या शेख यांनी कापूस पिंजला, तर नकाते कुटुंबियांनी गादी भरली. पलंगे कुटुंबियांनी चांदीच्या पलंगावर गाद्या अंथरल्या. सायंकाळी अभिषेकानंतर मूर्ती निद्रीस्त करण्यात आली. ही निद्रा २२ सप्टेंबरला समाप्त होईल आणि देवी सिंहासनावर विराजमान होऊन नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल.