पंढरपूर: उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग, चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा
उजनी धरणातून 1 लाख 1600 क्युसेक व वीर धरणातून भीमा नदीत 7 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पंढरपूर येथे शनिवारी रात्री पाणी दाखल झाले आहे. तर चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने दिलेला वेढा कायम आहे. त्यामुळे पंढरपूर येथे नदीच्या घाटांना पाणी लागलेले आहे. तर जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच भीमा नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे पंढरपूर, विष्णूपद, मुंढेवाडी, गुरसाळे, कौठाळी, पिराची कुरोली, पुळूज, आव्हे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.