पोलादपूर: पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर यांना दिले निवेदन
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या, अतिरिक्त शिक्षक आणि शाळा बंद होण्याच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर पालकांचा खाजगी शाळांकडे वाढता कल रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना करमाफीचा ठराव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर यांना देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून, या शिक्षणवर्धक ठरावास प्रथम मान्यता देणाऱ्या पहिल्या दोन ग्रामपंचायतींना मनविसे तर्फे रोख २१०० रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.