नवी मुंबई महानगरपालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणा-या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी या करिता विविध प्रसार माध्यमांचा उपयोग केला जात असून नवी मुंबईची प्रवासी जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटी बसेसचाही स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान प्रचारात प्रभावी उपयोग केला जात आहे. मतदान करण्याचा संदेश आकर्षक रितीने प्रसारित करणा-या डिझाईनने 20 एनएमएमटी बसेस दोन्ही बाजूने व मागील बाजूने सुशोभित करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत विविध विभागात फिरणा-या या आकर्षक सजलेल्या बसेसव्दारे 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.