भूजल पातळी वाढावी आणि उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायत आणि गोविंद विद्यालय, पालांदूर येथील शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत 'वनराई बंधारा' यशस्वीपणे पूर्ण केला आहे. नैसर्गिक समतोल राखण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत हिरहिरीने सहभाग घेतला. लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, परिणामी परिसरातील भूमिगत जलसाठ्यात वाढ होईल.