चाळीसगाव (प्रतिनिधी): शाळेतून घरी परतताना एसटी बसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या वडगाव लांबे येथील १३ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. कु. माधुरी शिवाजी मोरे (इयत्ता ८ वी) असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून, धुळे येथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत असून, माणुसकी विसरलेल्या चालक आणि वाहकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.