शहरातील चांदनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी दि. २० जानेवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्रस चांदनगर येथील रहिवासी अब्दुलहक अब्दुल वहाब (वय - ४१) वर्ष हे सुपारी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.२० जानेवारी रोजी त्यांच्या मावस भावाच्या मुलाला मुलगी झाल्यामुळे ते सकाळी कुटुंबासह घाटंजी येथे गेले होते. घरात त्यांचा लहान भाऊ उपस्थित होता. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत तो घरी असून त्यानंतर उधारी वसुलीसाठी बाहेर गेला होता. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वहाब कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरात प्रवेश करताच घरातील लाकडी आलमारी उघडलेली व लॉकर तोडलेले दिसून आले.