गणेशोत्सवासाठी राज्यातील सर्व आगारांमधून कोकण विभागात चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी कोरेगाव आगारातील दैनंदिन मार्गावरील बसेस बंद करून गाड्या नेल्या जातात. कोकणासाठी महामंडळाने स्वतंत्र नवीन गाड्यांची व्यवस्था करून स्थानिक आगारातील गाड्या अन्यत्र पाठवू नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सातारा जिल्हा एस.टी.प्रवासी संघटनेने दिला आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष विलास शहा व उपाध्यक्ष दत्तात्रय सुतार यांनी सहाय्यक वाहतूक अधीक्षक विजय जाधव यांना शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवेदन सादर केले.