फलटण शहरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिंती नाका येथे दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यामध्ये चिडून जाऊन कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. याप्रकरणी रविवारी पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ जणांना अटक करण्यात आली आहे. एक जण मात्र फरार झाला आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून रविवारी सकाळी ११ वाजता माहिती देण्यात आली.