: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रविवारी सुट्टीचे औचित्य साधत पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, बुधवार पेठ, कोथरूड, औंध, हडपसर यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सजावटीचे साहित्य, आरास साहित्य, कृत्रिम फुले, विद्युत दिवे, हार-फुले तसेच मिठाई यांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. गणेशोत्सवाच्या पूर्वीचा हा शेवटचा रविवार असल्याने बाजारपेठा नागरिकांनी गजबजून गेल्या होत्या.