गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच सातारा जिल्हा पोलीस दलाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनापरवाना डॉल्बीचा वापर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणि वाई पोलीस ठाण्यात या संदर्भात बुधवारी रात्री उशिरा साडेदहा वाजता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश तांबे यांनी कारवाई केली.