बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे आज दुपारच्या सुमारास ओबीसी व मराठा समाजामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मांजरसुंबा गावातील मुख्य चौकात ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. "मराठा समाजाला ओबीसीमधून दिलेले आरक्षण तात्काळ मागे घ्या" अशा जोरदार घोषणा देत त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, दुसरीकडे मराठा बांधव देखील ठिकठिकाणी जमा होऊन विविध घोषणा देत होते.