खामगाव-चिखली मार्गावरील अमडापूर नाका परिसरात रविवारी सकाळी झालेल्या अपघातात सजनपुरी येथील शफाअत शाहा किफायत शाहा (वय ५०) हे गंभीर जखमी झाले. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते गंभीररीत्या जखमी पडले असून त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी व्यक्तीला खामगावच्या सामान्य रुग्णालयात पोचवले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. दरम्यान, अपघाताची नोंद सामान्य रुग्णालयाने शहर पोलिसांकडे केली असून अज्ञात वाहन व चालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.