महाराष्ट्रातील शेतकरी कधी सुलतानी संकट, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करत आहे. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात न पाहिलेला कहर ओसंडून पडला आहे. पावसामुळे अनेक शेतजमिनी आज धरणाचे स्वरूप धारण करत आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पाणीच पाणी दिसत असून, सोयाबीनसह इतर पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन काढणीस सज्ज असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे पाणी शेतात साचले. आता ते पीक काढणे अशक्य झाले असून, पुढील आठ दिवसांतही पाणी ओसरण्याची चिन्हे नाहीत.