अंजनगाव नगर परिषद हद्दीतील ‘स्वप्न नगरी’ आणि ‘गजानन नगर’ या वस्त्यांमध्ये आज दुपारी १:३० वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: तलावाचे स्वरूप निर्माण झाले. तुंबलेल्या नाल्या आणि सांडपाणी व्यवस्थेच्या अभावामुळे पाणी थेट रहिवाशांच्या उंबरठयापर्यंत शिरले.या परिस्थितीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांनी नगर परिषदेकडे पावसाळ्यातील सांडपाणी व्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे निवेदन दिले होते.