दिग्रस शहरासह तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आज शनिवारी दुपारी धावंडा नदीला पूर आला असून धावंडा पुलावरील वाहतूक आज दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली होती. सततच्या पावसामुळे अरुणावती धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. सुरक्षेच्या दृष्टीने धरण प्रशासनाने सर्व ११ वक्रद्वार ७५ सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून पाटबंधारे विभागाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.