अकोला जिल्ह्यातील आलेगाव-पातुर मार्गावरील खड्डे आणि डबक्यांच्या समस्येमुळे संतप्त ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले. तीन फूट खोल गटारात बसून त्यांनी प्रशासनाला जाग आणणारे अनोखे आंदोलन केले. तब्बल तीन तास वाहतूक ठप्प ठेवत ग्रामस्थांनी “तत्काळ तोडगा निघालाच पाहिजे” असा इशारा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक धोक्यात येत होती. वाहनांचे इंजिन बंद पडणे, विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना होणारा त्रास यामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला होता.