रायगड जिल्ह्यात कष्टकऱ्यांचा सोहळा मानल्या जाणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. बुधवारी जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर आदी भागात तब्बल ९२८ गणरायांचे वाजत-गाजत आगमन झाले होते. दोन दिवस भक्तिभावाने पूजा-अर्चा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर गुरुवारी (ता. ११) डिजेच्या दणदणाटात, लेझर लाईट्सच्या झगमगाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये विसर्जन मिरवणुका निघाल्या.