बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील जीवनवाहिनी मानली जाणारी सिंदफना नदी मुसळधार पावसामुळे तुफानी भरून वाहत आहे. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून आज सकाळपासूनच नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत तर काही ठिकाणी नदीकाठच्या रस्त्यांवर पाणी साचले आहे.