अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा अंबाजोगाई शहरातील विविध मार्गांनी निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला.