लातूर -मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या लातूर तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील आंदोलक आज सायंकाळी पाच वाजता आपल्या गावात परतले. गावात पोहोचताच त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पारंपरिक ‘हलगी’ वादन, गुलाल उधळणे, तसेच फटाक्यांच्या रोषणाईत गावकऱ्यांनी परतलेल्या आंदोलकांचे जंगी स्वागत केले. गावाच्या प्रमुख रस्त्यांवर एकच जल्लोषमय वातावरण निर्माण झाले.