कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीसाठी मूळ गावी हिंगोलीला जात असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ते गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माण तालुक्यातील गोंदवले येथील सद्गुरु परब्रम्ह गोंदवलेकर महाराज देवस्थान येथे आढळून आले आहेत.