भामरागड भागातील आरोग्यसेवा ही नेहमीच आव्हानात्मक मानली जाते. रस्त्यांचा अभाव, नदीनाले, चिखलमय वाटा, पावसाळ्यातील पूरस्थिती अशा बिकट परिस्थिती असूनही लाहेरी व भामरागड परिसरातील काही वैद्यकीय अधिकारी जिवाची पर्वा न करता आदिवासी बांधवांना थेट दारावर आरोग्यसेवा पुरवत असल्याचे चित्र समोर येत आहे. लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ उपकेंद्रांद्वारे ४४ गावे आरोग्यसेवेत समाविष्ट आहेत. यापैकी बहुतेक गावे जुवी नाल्याच्या पलीकडे असून या नाल्यावर पूल नसल्याने प्रवास करताना मोठी कसरत होते.