धुळे तालुक्यातील नगाव परिसरात ‘आग्रा ते राजगड गरुड झेप’ मशाल पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे यांनी मशाल स्वीकारून मावळ्यांचे अभिनंदन केले. सरसेनापती नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज अॅड. मारुती (आबा) गोळे यांच्या संकल्पनेतून सहा वर्षांपासून ही यात्रा आयोजित होत असून यंदा दोन हजारांहून अधिक मावळे १३१० किमी पायी प्रवास करणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे व ‘डायबिटीज-बीपी मुक्त भारत’ जनजागृती हा यात्रेचा उद्देश आहे.