उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आल्यानंतर तो कमी करण्यात आला असला तरीही पंढरपूर परिसरात नदीच्या पाण्याचा धोका कायम आहे. आज शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर येथील गोपाळपूर पुलावर पाणी आल्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा यांचा संपर्क पूर्णपणे तुटल्याचे दिसून आले. गोपाळपूर पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.