वाशी तालुक्यातील विजोरा परिसरातील ग्रामस्थांनी समाजबांधवासाठी एकात्मतेचे दर्शन घडवले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकलेले बांधव उपाशी राहू नयेत, या भावनेतून गावकऱ्यांनी एकत्र येत भाकरी व ठेचा मोठ्या प्रमाणात तयार केला. ही रसद व्यवस्थित पॅक करून आंदोलक बांधवांच्या हातात पोहोचावी, यासाठी गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. केवळ अन्नधान्य नव्हे तर मानसिक बळ देण्याचे कार्यही या माध्यमातून ग्रामीण समाजाने पार पाडले आहे.