लाखनी नगरपंचायत हद्दीत असलेल्या मटण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. मटण मार्केटला लागूनच भाजीपाला दुकाने असल्याने ग्राहकांना नाक दाबून खरेदी करावी लागते. या परिसरात इतकी घाण साचलेली आहे की तेथून चालणे देखील कठीण झाले आहे. कचरा व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असून स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.