दापोली तालुक्यातील पोफळवणे बेलवाडी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत अविस्मरणीय प्रसंग घडला. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान अचानक रस्त्यावर एक सुंदर मोर आला. हा मोर चक्क मिरवणुकीच्या मधोमध उभा राहिला आणि इकडे तिकडे बागडू लागला. त्याचे देखणे रूप पाहून विसर्जन मिरवणुकीतील नागरिक भारावून गेले. मुलांनी ‘अरे नाच नाच’ अशी हाक मारल्यावर मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढला. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोरराज स्वतःच आल्याचा अनुभव घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.