फलटण: डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी फलटण शहरात कँडल मार्च; न्यायाच्या मागणीने शहर दणाणले
फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा या मागणीसाठी फलटण शहरात नागरिकांच्या व सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कँडल मार्च काढण्यात आला. न्यायासाठी झालेल्या या शांत मोर्चामध्ये विविध क्षेत्रातील नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील महात्मा गांधी चौकातून हा कँडल मार्च निघाला.